Maharashtra Legislature | (Archived images)

विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. गंमत म्हणजे राज्यसभेप्रमाणे याही निवडणुकीत निश्चित जागांपेक्षा अधिकचा एक उमेदवार रिंगणात उतरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपक्ष आणि छोटे-छोटे पक्ष सत्ताधारी आणि विरोधकांच्या नजरेत आले आहेत. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पराभूत होणारा 11 वा उमेदवार हा समोरच्या गटातला राहावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जोमाने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गाठीभेटींना वेग आला आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने आकड्यांचे गणीत आणि रणनिती पक्की केल्याने त्यांना मविआवर मात करणे शक्य झाले. भाजपचा सहावा उमेदवार सहज निवडून आला. परिणामी शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. आताही विधानपरिषदेच्या 10 व्या जागेसाठी चुरस होणार आहे. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांचा कौल कोणाच्या बाजूने राहतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. (हेही वाचा, MLC Election 2022: पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषद नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रतिक्रिया)

दरम्यान, बहुजन विकासआघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन आमदार आहेत. त्यामुळे सर्वाधिक आमदार असलेल्या या छोट्या पक्षाचे उपद्रवमुल्य लक्षात घेऊन सत्ताधारी आणि विरोधक यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यसभा निवडणुकीचा विचार करता आपली सर्वच्या सर्व मते राखण्यात मविआ यशस्वी ठरली. राज्यसभा निवडणुकीत मविआचे एकही मत फुटले नाही. दुसऱ्या बाजूला भाजपलाही मते कायम ठेवण्यात यश आले. पण, राज्यसभेची खासीयत अशी की राज्यसभा निवडणुकीत होणारे मतदान हे उघड असते. पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच मत टाकले जाते. त्यामुळे फाटाफूट होणे शक्यतो कमी घडते.

विधानपरिषद निवडणुकीत मात्र गुप्तमतदान पद्धती वापरली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर मग ते सत्ताधारी असोत की विरोधी पक्ष. दोघांनाही आपली मते कायम राखण्याचा आव्हान कायम आहे. त्यातच 10 व्या जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची पूर्ण मदार ही अपक्ष आणि छोट्या पक्षांवरच आहे.