खानापूर-आटपाडी विधानसभा (Khanapur Atpadi Assembly Constituency) मतदार संघातील शिवसेना (Shiv Sena) आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी मंत्रिपदाचा विषय नशिबावर सोडला आहे. हा विषय त्यांनी केवळ स्वत:च्याच नव्हे तर जिल्ह्याच्याही नशिबाशी जोडला आहे. आमच्यात आणि शिवसैनिकांच्यात काही मतभेद जरुर आहेत. परंतू हे मतभेद कालांतराने नक्कीच निवळून जातील, अशी भावना अनिल बाबर यांनी व्यक्त केली आहे. यासबोतच त्यांनी जर जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रिपदही मिळून जाईल, असेही म्हटले आहे. त्यामुळे आमदार बाबर यांनी सूचक वक्तव्य तर केले आहे. परंतू, त्यात कोणतीही निश्चिती नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र या वेळी तरी अनिलभाऊ यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे.
आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात परतताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले पाठिमागच्या अडीच वर्षात मतदारसंघातील विकास पूर्णपणे खुंटला होता. त्यामुळे आम्ही शिंदे गटात जाऊन नवे सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली. दरम्यान, बाबर यांनी सांगली येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख असल्याचे सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion Soon: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस)
अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द ही नेहमीच पक्षांतराची राहिली आहे. सुरुवातीला ते काँग्रेसकडून आमदार होते. पुढे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष आमदार झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर ते तेथेही रमले नाहीत. राजकीय सोय पाहात त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आता ते उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतही न राहता शिवसेनेतील बंडखोर असलेल्या एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.
सांगलीतून मंत्रीपदासाठी अनेक इच्छुक
दरम्यान, सांगली जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. त्यात अनिल बाबर यांच्यासह भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांचीही नावे चर्चेत आहे. याशिवाय बाबर यांच्यात मतदारसंघातील विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात मंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.