Mission Begin Again 2: महाराष्ट्रात 1 जुलैपासून 'मिशन बिगीन अगेन'च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; राज्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून
Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

कोरोनाचा नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) एकीकडे प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन (Lockdown) 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’ (Mission Begin Again) च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र सरकारने काही सेवा-सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली असून यासाठी सरकारकडून नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करत आहोत. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. राज्यात 1 ते 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा असणार आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे व अन्य महानगरपालिकांच्या हद्दीत आणि अन्य भागांत नेमके कोणते नियम असतील. कोणत्या गोष्टी सुरू राहणार, काय काय बंद राहणार हे जाणून घ्या. हे देखील वाचा- Coronavirus रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ची सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या उपक्रमाचे उद्घाटन

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट-

खालील नियम कायम राहणार-

- घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.

- सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये सहा फूट अंतर राखणे बंधनकारक असणार आहे.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लग्न समारंभाला परवानगी आहे. परंतु, 50 पेक्षा जास्त माणसांना उपस्थित राहण्यास परवानगी नाही.

- अंत्यविधीवेळी सुद्धा 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.

लॉकडाऊनमध्ये खालील गोष्टींना सशर्त परवानगी-

- ऑनलाइन/दूरशिक्षण याला मान्यता देण्यात आली आहे.

- इतर दुकानेही संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील.

- अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यात आली आहेत.

- रेस्टॉरंटला होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी आहे.

- वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी आहे.

- टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी (1 चालक + 2 प्रवाशी) केवळ आवश्यक प्रवासासाठी उपलब्ध असेल. दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी आहे.

- आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता इतर सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी.

- केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सोमवारी 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 5 हजार 257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी मृत्यू झालेल्या 181 रुग्णांमध्ये 78 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधील आहेत. तर, 103 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 69 हजार 883 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 73 हजार 298 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.