Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळील घटना
Aditya Thackeray | (Photo Credit: Facebook)

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाला मंगळवारी (29 मार्च) जोरदार अपघात (Minister Aditya Thackeray's Security Convoy Crashes) झाला. आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना ही घटान घडली. आदित्य हे सुखरुप असून त्यांच्या ताफ्यातील वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ हा अपघात घडला. ताफ्यातील दोन-तीन वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या नियोजीत दौऱ्यानुसार सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला निघाले होते. या वेळी खारेपाटण येथील हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी साधारण 11.30 वाजणेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील गाड्या एकमेकांवर आदळल्या आण हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षीत आहेत. (हेही वाचा, Aaditya Thackeray On Yashwant Jadhav Diary: यशवंत जाधव, मातोश्री, घड्याळ भेट यांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे हे पूर्णपणे आत्मविश्वासात दिसले. या दौऱ्यात राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सध्या प्रसारमाध्यमांतून चर्चेत असलेल्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, यशवंत जाधव यांनी त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर खुलासा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व अफवा आहेत. अफवांच्या आधारे देण्यात आलेल्या वृत्तांवर काय आणि किती प्रतिक्रिया द्यायच्या यालाही काही मर्यादा असतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.