आता स्थलांतरित मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही; रुग्णालयांबाहेच्या लांब रांगा टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

केंद्र सरकारने अचानक कोरोना व्हायरस लॉक डाऊनची (Coronavirus Lockdown) घोषणा केल्याने अनेक लोक आहे त्या ठिकाणीच अडकले. यामध्ये सर्वात जास्त त्रास झाला तो परराज्यातील कामगारांना (Migrant workers). अशात या मजुरांबाबत एक महत्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने त्यांना आपल्या राज्यात जाण्यासाठी खास रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली. आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रांची (Medical Certificates) आवश्यकता नसणार. अशा प्रमाणपत्रांसाठी डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर लागलेल्या मोठ्या रांगा पाहून, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एएनआय ट्विट -

लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांत अडकलेल्या परराज्यांतील मजुरांचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. संकटाच्या परिस्थितीमुळे लाखो मजूर देशाच्या विविध भागात आहे त्या ठिकाणीच होते. त्यांना दिलासा देत अशांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत विशेष श्रमिक ट्रेनची (Shramik Special Trains) सेवा सुरु करण्यात आली. मजुरांची वैद्यकीय तपासणी व्हावी व ज्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत फक्त त्यांनाच प्रवासाची मुभा होती. या वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी गेले काही दिवस अनेक रुग्णालयांच्याबाहेर मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हे पाहून, ज्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ ठिकाणी जायचे आहे त्यांना आतापासून वैद्यकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही. केवळ थर्मल चेकिंग केले जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेरच्या लांब रांगा टाळण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशा स्थलांतरित मजुरांच्या तिकिटांचा प्रश्नही चर्चेचा विषय बनला होता. त्यावर लॉक डाऊनच्या काळात घरी परतणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या प्रवासाचा 85% खर्च केंद्र सरकार तर 15% खर्च राज्य सरकार करेल, असा दावा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केला आहे. (हेही वाचा: मुंबईतील 88 हॉटेल्समधील 3,343 खोल्या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या क्वारंटाइनसाठी राखीव, बीएमसीची माहिती)

दरम्यान, महाराष्ट्रात आज 1,362 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात कोरोना बाधितनाची संख्या 18,120 वर पोहचली.