MHADA Lottery: म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरीचा आज निकाल सकाळी 10 वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात जाहीर करण्यात येणार आहे. या घरांचा ताबा मिळवण्यासाठी 1 लाख 64 हजार 458 अर्ज भरले गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोणाला घर मिळणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
म्हाडाच्या मुख्यालयाच्या पटांगणात मंडप उभारण्यात आला असून मुंबईकरांना तेथून थेट निकालाचे आकडे समजणार आहेत. तर म्हाडाने जाहीर केलेल्या 1 लाख 384 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मुलुंड, वडाळा, महावीरनगर, गोरेगाव येथील घरांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत कोटीमध्ये असून या गटात केवळ तीन घरे असून या घरांसाठी 136 अर्ज आले आहेत. तर मराठी नाट्य- सिनेगृहातील मंडळींनीसुद्धा या लॉटरीकरता अर्ज भरला आहे. तसेच ग्रँड रोडवरील पाच कोटींचे घर कोणला मिळणार याकडे सर्वांचे आतुरतेने लक्ष लागून राहिले आहे.
निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे म्हाडाच्या पटांगणात डिजिटल पडदे लावण्यात आले असून सायंकाळी 6 वाजल्यानंतर सोडतीचा सविस्तर निकाल जाहीर होणार आहे.