
म्हाडा (MHADA) कडून कोकण विभागात (Konkan Division) 2264 घरांसाठी काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आहे. 31 जानेवारीला निघणारी लॉटरी आता फेब्रुवारी महिन्यात निघणार आहे अशी माहिती समोर येत आहे. अद्याप नवी तारीख जाहीर केलेली नाही. येत्या काही दिवसांत त्याची देखील घोषणा केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.
म्हाडाने 2264 घरांसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये 594 सदनिका, 15% एकात्मिक गृहनिर्माण योजनेत 825 घरं आणि कोकण मंडळाच्या 728 फ्लॅट्स विक्रीसाठी होते. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा होती तर अल्प उत्पन्न गटासाठी 9 लाख रुपये आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 12 लाखांचे उत्पन्न मर्यादा होती.
11 ऑक्टोबर 2024 पासून या म्हाडाच्या घरांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. 27 डिसेंबरला सोडत काढली जाणार होती. पण 10 डिसेंबरपूर्वीच मंडळाने अर्ज करण्यासाठीची तारीख 26 डिसेंबरपर्यंत वाढवली. 27 डिसेंबरची सोडत 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
एकूण 16,000 पेक्षा जास्त परवडणाऱ्या घरांपैकी, 2,200 घरं भाग्यवान लॉटरी विजेत्यांना दिली जातील तर 14,000 घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार आहेत. लॉटरी अंतर्गत सर्वाधिक घरे ठाणे शहर आणि जिल्ह्यात असून त्यात कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरस, वेंगुर्ला आणि मालवण मध्ये आहेत. या म्हाडाच्या लॉटरीत परवडणाऱ्या घरांच्या किंमती 15 लाख ते 1 कोटी रूपये दरम्यान आहे.