Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

राज्य सरकार सध्या राज्यातील गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेले मेट्रो आणि इतर प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प हाती घेतले आहेत. ते म्हणाले, आम्ही मंत्रालयात बसून निर्णय घेत नाही, जागेवरच निर्णय घेतो. त्यांच्या सरकारने या वर्षाच्या जून अखेरीस सत्तेवर आल्यानंतर हजारो फायली निकाली काढल्या आहेत.

गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या वेदांत-फॉक्सकॉनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘जर एखादा उद्योग राज्याबाहेर गेला, तर काय होईल?, आम्हाला दुसरा कुठला चांगला मिळेल.’ माथाडी दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबईत आयोजित मेळाव्याला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की, ‘गेल्या अडीच वर्षांत राज्यात आलेल्या उद्योगांची यादी पाहावी लागेल. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आलो आहोत.’

ते पुढे म्हणाले, ‘मी कोणावरही भाष्य करणार नाही. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने कामाचा वेग स्वतः पाहिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोसह राज्यातील इतर प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्यात आले आहेत.’ ते म्हणाले, ‘सध्याच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे राज्यातील नागरिकांनी आता बदल झालेला पाहिला आहे. आमचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. आम्ही राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत. आम्हाला राज्याचा समतोल विकास हवा आहे.’ (हेही वाचा: शिंदे सरकारचा उद्धव ठाकरे गटाला झटका! राज्य वन्यजीव मंडळातील आदित्य ठाकरेसह 12 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 75,000 लोकांची भरती करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले की, अलीकडेच गणेश उत्सवात 9,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि हे शक्य झाले कारण त्यांच्या सरकारने सणांवरची बंदी उठवली होती. दरम्यान, या वर्षी 30 जून रोजी शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंडखोरी केल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले.