Metal Sheet Collapsed in Mumbai: बांधकामाधीन SRA इमारतीच्या पत्र्याचे छत कोसळले, 10 वर्षांच्या मुलासह वडिलांचा मृत्यू; मुंबई येथील विक्रोळी परिसरातील घटना
Metal Sheet Collapsed in Mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

बांधकामाधीन असलेल्या एसआरए इमारतीचे (Underconstruction SRA Building) पत्र्याचे छत मुसळधार पावसात कोसळल्याने (Metal Sheet Collapsed) पितापुत्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील वडील हे याच इमारतीत सुरक्षारक्षक (Security Guard) होते. तर त्यांचा मुलगा 10 वर्षांचा होता. ही घटना रविवारी (9 जून) रात्री 10 वाजणेच्या सुमारास विक्रोळी (Metal Sheet Collapsed at Vikhroli) परिसरात घडली. घटनेनंतर दोघांनाही वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. मुंबई महापालिकेने घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाधीन इमारतीचा छतावरील सुरक्षा कठड्याचा एक भाग आणि स्लॅब कोसळला. दरम्यान, एसआरएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्षात ही धातूची शीट (पत्र्याचे शेड) होती जी कोसळली. SRA ने प्रकल्पासाठी जबाबदार असलेल्या विकासकाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.

वडिलांना डबा घेऊन गेलेल्या मुलाचा मृत्यू

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथे ही घटना घडल्यानंतर पीडित नागेश रेड्डी (38) आणि त्यांचा मुलगा रोहित रेड्डी यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पार्कसाइट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले की, "सुरक्षारक्ष असलेल्या वडिलांना जेवण देण्यासाठी मुलगा रोहीत डबा घेऊन गेला असता छत कोसळण्याची घटना घडली. ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला." (हेही वाचा, Mumbai: विक्रोळीतील SRA प्रकल्पाच्या ठिकाणी 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला; दोन वर्षातील दुसरी घटना (Watch Video))

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट

एका एसआरए अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, साहित्य पडू नये आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतीभोवती अतिरिक्त जाळी टाकून धातूची शीट बसवण्यात आली होती. मात्र, लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूंनी आधार दिलेला धातूचा पत्रा सुमारे 12 फूट उंचीवरून खाली पडला. दोन ते तीन धातूचे पत्रे एकाच वेळी कोसळले. ही घटना कशी घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक आणि त्याच्या मुलाचा बळी गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले.  (हेही वाचा, Mumbai Rains: विक्रोळी मध्ये पहिल्याच मुसळधार पावसात घराचा काही भाग कोसळून बाप-लेकाचा मृत्यू)

विकासकाला काम थांबविण्याचे आदेश

"इमारतीचे आरसीसी काम आणि प्लास्टरिंग पूर्ण झाले आहे. विकासक खिडक्या बसवण्याच्या प्रक्रियेत आहे. ही घटना अपघाती असल्याचे दिसते. तरीही, विकासकाला काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे., असे एसआरए अधिकाऱ्याने पुढे सांगितले. स्लॅबचा भाग ग्राउंड-प्लस-फाइव्ह बांधकामाधीन इमारतीवरून पडला. दरम्यान, घटनेनंतर, मुंबई अग्निशमन दलाने बचाव साधनांचा वापर करून स्लॅबचे काही अनिश्चितपणे लटकलेले भाग काढून टाकले. पार्कसाईट पोलिसांनी आपल्या दप्तरी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आमची भूमिका साइटवर आपत्ती व्यवस्थापन सहाय्य पुरविण्यापुरती मर्यादित होती. इमारत SRA च्या अधिकारक्षेत्रात येते." दरम्यान, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.