मुंबईकरांनो (Mumbaikar) जर तुम्ही रविवारी म्हणजेच 20 ऑगस्टला प्रवासासाठी बाहर पडणार असाल तर रेल्वेच्या मेगाब्लॉकचे (Megablock) वेळापत्रक पडूनच बाहेर पडावे. कारण उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 20 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल बंद (Mumbai Local) असतील तर काही उशिराने धावतील.
मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर हा मेगाब्लॉक असेल मात्र पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे नागरिकांना जास्त त्रास हा होणार नाही आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11 .05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11. 10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.रात्री 12:40 ते पहाटे 4:40 पर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार-वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील.