Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबई लोकलच्या (Mumbai Local) दुरुस्ती कामासाठी घेण्यात येणारा मेगाब्लॉक (Megablock) हा यावेळेस मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर (Harbour Railway) अशा तिन्ही मार्गांवर नियोजित आहे. उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी या ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे दरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर/ट्रान्स हार्बर रेल्वेच्या पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. तर, मरिन लाईन्स-माहिम स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासोबतच या आठवड्यात कुर्ला (Kurla) स्थानकातील धोकादायक पादचारी पूल पाडण्याच्या कामासाठी शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल असे, मध्य रेल्वेने सांगितले आहे.

मध्य रेल्वे

कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 10.54 ते दुपारी 3.52  यावेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे 30 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

यासोबतच 16 व 17 नोव्हेंबर रोजी कुर्ला पूल पाडण्याच्या कामासाठी कुर्ला स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर रात्री 11.30 ते पहाटे 4.30 या वेळेत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत माटुंगा ते विद्याविहार दरम्यान शनिवारी रात्री 11.21  नंतर धावणाऱ्या धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर रेल्वे

पनवेल-वाशी आणि बेलापूर/सीवूड-खारकोपर अप आणि डाऊन मार्गवर सकाळी 11.30 ते दुपारी 4 यावेळेत ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या लोकलफेऱ्या रद्द असणार आहेत. प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी-वाशी मार्गावर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे/वाशी - नेरुळ मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

मरीन लाइन्स ते माहीम स्थानकांच्या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 यावेळेत ब्लॉक असणार आहे. परिणामी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकावर लोकल थांबणार नाही. प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रल स्थानकांतून प्रवास करण्याची मुभा आहे.

मेगाब्लॉकमुळे खास रविवारी फिरायला जाणाऱ्यांची पंचाईत होते. उद्या सुद्धा ब्लॉकच्या कालावधीत लोकलच्या फेऱ्या विलंबाने असतील त्यामुळे प्रवास करताना अडथळा येऊ नये याची यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून मगच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.