मुंबईतील मालाड मधल्या मालवणी (Malvani Malad) भागात काल ( 9 जून) रोजी इमारत कोसळल्याच्या (Malad Building Collapse Update) घटनेने संपूर्ण शहर हादरले. या दुर्दैवी घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि प्रशासनाची जबाबदारी खूप वाढली असल्याचंही सांगितलं. यावेळी मृतांमध्ये समावेश असलेल्या त्या पाच वर्षांच्या लहान मुलाचा काय दोष, असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
मालवणी दुर्घटना आणि मुंबईतल्या पावसाच्या संदर्भात त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या जबाबदारीचीही जाणीव करुन दिली. त्या म्हणाल्या, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करायला हवं जेणेकरुन अशा दुर्घटना टळतील. या दुर्घटनेमुळे प्रशासनाची, आमची जबाबदारी खूप वाढली आहे. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.हेदेखील वाचा- Malvani Malad Building Collapsed Update: मुंबईत मालवणी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, 7 जण जखमी
यावेळी पत्रकारांनी त्यांना अनधिकृत बांधकामांबाबत विचारले असता, "कोरोनाच्या काळात अनधिकृत बांधकांमे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र, त्यांचा शोध घेऊन महापालिका त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार आहे." असे त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षाकडून या दुर्घटनेमुळे आणि पावसातल्या महापालिकेच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यावरुनही महापौरांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपाला वाट्टेल ते बरळण्याचा पूर्व अधिकार आहे, ते स्वप्नात आहेत म्हणून बरळत आहेत. त्यांनी भो भो करत राहावं, अशा शब्दात महापौरांनी भाजपावर टीका केली आहे.