Mumbai: मध्य रेल्वेने (Central Railway) तिकीटविरहित प्रवास (Ticketless Travellers) करणाऱ्या प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. मध्य रेल्वेने सोमवारी ठाणे स्थानकावर व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 3092 तिकीट नसलेल्या प्रवाशांना पकडण्यात आले. तसेच केवळ एका दिवसात एकूण 8.66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पहिल्या शिफ्ट दरम्यान, ठाणे स्थानकावर 61 तिकीट तपासनीस आणि 15 रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचार्यांचा समावेश होता. त्यांनी 1585 तिकीटविरहित प्रवासाची प्रकरणे शोधून 4.26 लाख रुपयांचा दंड वसूल केला.
दुसऱ्या शिफ्टमध्ये आणखी 59 तिकीट तपासनीस आणि 15 आरपीएफ कर्मचारी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्यांनी तिकिटविरहित प्रवासाची 1507 प्रकरणे पकडली. परिणामी एकूण 4.40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (हेही वाचा -Change in Platform Numbers of Dadar Station: दादर स्थानकांत मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल)
प्रवाशांनी तिकीट नियमांचे पालन करावे आणि जबाबदार प्रवासाला चालना मिळावी यासाठी हे तिकीट तपासणी ऑपरेशन्स भविष्यात सुरू राहतील, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रवासी सुखसोयी आणि महसुलाची अखंडता राखण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये तिकीटविरहित प्रवासावरील कारवाईला सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने सोमवारी तिकीट नसलेल्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. परिणामी तिकीट नसलेल्या प्रवाशांची 26,000 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत आणि एकूण ₹1.23 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हे ऑपरेशन 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आले होते.