Dhule | Instagram

भारतामध्ये आज (26 जानेवारी) 74 वा प्रजासत्ताक दिन (Indian Republic Day Celebration) साजरा केला जात आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र धुळ्यात (Dhule) या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही लोकांनी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिल परिसरात काहींनी हा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली आहे.

धुळे शहरात चितोड रोड मिल परिसरामध्ये मागील 30-40 वर्ष काही नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांना घराचा 7/12 मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी केली जात आहे. पण प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काहींनी आत्मदहनाचा इशारा दिला.

आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर या नागरिकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवून त्यांच्याकडून डिझेलचे कॅन हिसकावून घेतले.

काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर हे डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळीच त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.