Mask, sanitizer (PC - pexels/ Pixabay)

भारतातचं नाही तर जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकवर काढलं आहे. चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने हाहाकार माजवला आहे. एवढचं नाही तर या नव्या व्हेरिअंटचे संशयित रुग्ण आता भारतात देखील आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्य सरकारला खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी याच पार्श्वभुमिवर गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना महामारी विरोधात पहिलं पाउल म्हणून काही विशेष नियम जारी करण्यात आले आहे. किंबहुना राज्य सरकारकडून तसेच गर्दी होत असलेल्या ठिकाणांकडून याबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. तरी सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे राज्यातील प्रार्थनास्थळे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभुमिवर राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे या कालावधीत पर्यटकांची प्रार्थनास्थळांवर अधिक गर्दी असते. म्हणुन राज्यातील काही महत्वाच्या मंदिर प्रशासनाकडून विशेष नियम जारी केले आहेत.

 

नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वणीच्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड द्वारे भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून गर्दी टाळण्याबाबत भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. वणी आणि त्र्यंबकेश्वर प्रमाणेचं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्क वापरावे तसेच कोविडच्या बूस्टर डोसचं (Covid 19 Booster Dose) लसीकरण सुद्धा करुन घ्यावं असं, आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Mumbai Coronavirus: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 3 रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 1,155,067 वर)

 

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. तर पुण्यातील आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ गणपती देवस्थान प्रशासनानंही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरावा, असं आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.