दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर मराठी फलक लावण्यासाठी बीएमसीने (BMC) अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे. आता अजूनही असे फलक न लावणाऱ्या दुकानदारांवर बृहन्मुंबई महानगरपालिकाने सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीने चार वेळा मुदतवाढ देऊनही मोजक्याच दुकानदारांनी मराठीमध्ये फलक लावले आहेत. उपमहापालिका आयुक्त, (विशेष) संजोग काबरे यांनी सांगितले की, ते किती दुकानांनी त्यांच्या दुकानांवर मराठी फलक लावले आहेत ते पाहणार आहेत.
ज्यांनी अजूनही मराठी फलक लावले नसतील त्यांना सात दिवसांचा इशारा देण्यात येईल व त्याचेही पालन न केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. काबरे पुढे म्हणाले, कायद्यानुसार ते दुकानदाराकडून प्रति कामगार 2,000 रुपये दंड आकारू शकतात. सुमारे 48 टक्के दुकानदारांनी आदेशाचे पालन केल्याचे एफपीजेने निदर्शनास आणून दिले आहे. यावर काबरे म्हणाले, मुंबईत अंदाजे 5 लाख दुकाने आहेत. त्यातील 2 लाख दुकानांना त्यांनी भेटी दिल्या असून त्यापैकी 1 लाख दुकानांनी मराठी फलक लावले आहेत.
राज्य सरकारच्या मराठी फलक लावण्याच्या आदेशाविरोधात रिटेलर्स असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेली होती, पण कोर्टाने कोणताही आदेश दिलेला नाही. मार्च 2022 मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी फलक लावणे आवश्यक आहे असा निर्णय घेतला होता. (हेही वाचा: सी लिंकवरील भीषण अपघातामधील चालकाला एक दिवसाची कोठडी; MSRDC घेणार सुरक्षा उपायांचा आढावा)
दुकानदारांच्या संघटनेने वेळोवेळी बीएमसीला हे फलक बनवण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती केली आहे. अनेक दुकानांवर फॅन्सी बोर्ड आहेत. असे फॅन्सी बोर्ड बनवणाऱ्या कलाकारांना दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणत ऑर्डर मिळत असल्याने हे बोर्ड वेळेत पूर्ण होत नाहीत. फॅन्सी बोर्ड बनवणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. तसेच असे फॅन्सी बोर्ड तयार करणारे कलाकारही मिळेनासे झाले आहेत. दुकानदारांच्या अशा सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर बीएमसीने ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.