Suicide | (Photo Credits: unsplash.com)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकार जोरदार हालचाली करत आहे. आंदोलनही काहीसे नर्णयाक टप्प्यावर आले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही राज्य सरकारला मुदत वाढवून दिली आहे. असे असले तरी मराठा समाजातील अनेक तरुणांनी या आधी आत्महत्या केल्या आहेत. आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करु नये. आपण लढून आरक्षण मिळवू असे जरांगे पाटील यांनी अवाहन केले आहे. तरीसुद्धा आज पुन्हा एकदा आत्महत्या घडल्याचे वृत्त आहे. अकोला तालुक्यातील अभय गजानन कोल्हे या 19 वर्षीय तरुणाने पुणे येथील चाकण भागात आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे समाजामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्याचे समजते.

कोरोना काळात वडिलांचे निधन

अधिक माहिती अशी की, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या अभय कोल्हे याच्या वडिलांचे कोरोना महामारीत निधन झाले आहे. त्यामुळे आगोदरच हालाकीची असलेली कुटुंबाची स्थिती आणखीच खालावली. त्यामुळे शिक्षणासाठी धडपडणारा अभय अधिकच खचला. केवळ आरक्षण नसल्यामुळेच आपल्याला शिक्षण घेता येत नसल्याची भावना त्याच्या मनात बळावली. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शिवाय कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही त्याच्यावरच होती. तो कुटुंबासोबत चाकण परिसरात राहात होता. 2 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजणेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची विष पिऊन आत्महत्या,जालना येथील घटना)

आत्महत्या केल्याने स्वप्ने अपूर्णच

अभय याने पाठिमागच्या वर्षी आयटीआय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो पुणे येथे इंटर्नशिप करत होता. त्याला इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रतिमहीना 12,000 रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. त्यातूनच तो कसाबसा संसाराचा गाडा हाकत होता. मात्र, आत्महत्या केल्याने त्याचे स्वप्न तर पूर्ण झालेच नाही. परंतू, कुटुंबही उघड्यावर आले.

मित्र नाश्ता करायला गेला अन..

धक्कादायक म्हणजे अभय आपल्या चार मित्रांसोबत खोलीवर राहात असे. चार मित्रांपैकी दोघे जण हे कामावर गेले होते. त्यामुळे अभय आणि त्याचा आणखी एक रुम पार्टनर खोलीत होते. रुमवर असलेला पार्टनर नाश्ता करण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून अभयने पाठिमागे आत्महत्या केली. रुम पार्टन आल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने संबंधितांना संपर्क केला. अभयच्या आत्महत्याची बातमी समजताच तळेगाव परिसरात राहणारे त्याचे मामा कैलास गवळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात एक चिठ्ठी आढळून आली. ज्यामध्ये "सॉरी, आई... मी चांगला मुलगा नाही बनू शकलो. आता तुला मी काही पागल करत नाही, बाय बाय", असे लिहिल्याचे आढळून आले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दोन वेळा उपोषण केले आहे. आंदोलनाचा आणि उपोषणाचा दुसरा टप्पा सुरु असताना राज्य सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. या वेळी झालेल्या चर्चेतून आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 25 पेक्षा अधिक लोकांनी आरक्षणाची मागणीवरुन आत्महत्या केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या आत्महत्या सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे.