मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यभरात वातावरण तापले आहे. एका बाजूला मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रजकीय नेत्यांना या आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामती येथूनच विरोध सुरु झाला आहे. बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवार यांना बोलावू नये आणित्यांनीही येऊ नये, असा इसाराच मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. संघटनेच्या वतीने तशा आशयाचे पत्र साखरकारखाना आणि पोलीस प्रशासनास देण्यात आल्याचे वृत्त आहे.
मराठा क्रांती मोर्चाने विरोध करताना म्हटले आहे की, कारखान्याने अजित पवार यांना मोळीपूजनास बोलावू नये. तसेच, ते जरी आले तरी त्यांना विरोध केला जाईल कारखान्यात जाऊ दिले जाणार नाही. कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती येथे फिरु दिले जाणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अजित पवारांच्या हस्ते येत्या 28 ऑक्टोबर रोजी मोळी पूजन होणार आहे. त्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाने बारामती येथे इशारा दिला आहे की, अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही.
सकल मराठा समाजाने राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, अशी जरांगे यांची तक्रार असून त्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सरकार हे मायबाप असते. त्यामुळे त्यांना आमच्या वेदना समजू शकतील अशीच आमची धारणा होती. मात्र, राज्य सरकार दिशाभूल करु लागले आहे. सरकारने आम्हाला 31 दविसांची म्हणजे एक महिन्यांची मूदत दिली होती. आम्ही त्यांना आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून दिली. काय करायचा तो अभ्यास करा पण निर्णय घ्या, असे आम्ही म्हणत होतो. मात्र, मुदत संपून 41वा दिवस उलटला तरीही सरकार निर्णय घेण्याचे नाव घेत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत अन्न, पाणी आणि सलाईन, औषधही घेतले जाणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.