राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत श्रीमंत शाहू छत्रपती यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. या भेटीवेळी माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित होते. अजित पवार हे कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी न्यू पॅलेस येथे ही भेट झाली. कोल्हापूरच्या राजर्षी शाहु घराण्यातील खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांच्या दौऱ्यात ही भेट नियोजित नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या या भेटीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. प्राप्त माहिती अशी की, अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट ही पूर्वनियोजित नव्हती. त्यामुळे या भेटीबाबत प्रसारमाध्यमांना किंवा राजकीय वर्तुळातही माहिती नव्हती. कोल्हापूर येथे दाखल होताच अजित पवार हे न्यू पॅलेस येथे अचानक दाखल झाले. येथे त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे यांची भेट घेतली. या भेटीवेळी मराठा समाजाचे इतरही काही नेते उपस्थित असल्याची माहिती आहे. अचानक झालेली ही भेट साधारण पाऊणतासापेक्षा अधिक काळ चालली. येत्या 16 जून रोजी कोल्हापूर येथून मराठा समाज मोर्चा काढणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोल्हापूर जिल्हा जणून कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट झाल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत एक बैठक होईल. त्यानंतर पुढील दौरा नियोजित कार्यक्रमानुसार सुरु होणार असल्याची माहिती आहे. (हेही वाचा, मराठा समाजाला न्याय हवा आहे, आश्वासन नको, असे सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी प्रकरणावरही केले भाष्य)
दरम्यान, मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात कळीचा ठरत असताना दुसऱ्या बाजालू नक्षलवाद्यांनीही आपली एक पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांनी एक पत्रक काढून मराठा नेत्यांनी दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असे म्हटले आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पक्षक काढले आहे. या पत्रकावर भूमिका व्यक्त करताना संभाजिराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशुन म्हटले आहे की, मराठा समाज आरक्षणाप्रती दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल आपला आदर करतो. परंतू, तुम्ही जर स्वत:ला शिवबांचे खरोखरच वैचारिक वारसदार मानत असाल तर मुख्य प्रवाहात सहभागी व्हा.