मराठा समाजाला न्याय हवा आहे, आश्वासन नको, असे सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी प्रकरणावरही केले भाष्य
Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज कोपर्डीत (Kopardi) जाऊन 2016 मध्ये येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील कुटूंबियांची भेट घेतली. कोपर्डी घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का झाली नाही असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी उपस्थित केला आहे. स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने करावी असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी भाष्य केले. मराठा समाजाला न्याय हवा आहे, आश्वासन नको असेही यावेळी म्हणाले.

खासदार संभाजीराजे छत्रपती हे कोपर्डीच्या दौऱ्यावर आहेत. या खटल्यातील आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी करायला चार वर्षे का लागली असा सवाल करत सरकारने यापुढे काय पावलं उचलावीत या दृष्टीने आपण कोपर्डी दौरा करत असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.हेदेखील वाचा- खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध; रीनैसंस द स्टेट पुस्तकातील लिखाण प्रकरण

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "2016 साली ही दुर्दैवी घटना घडली. 2017 साली या प्रकरणाचा निकाल लागला. आता हे प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींच्या दोन वर्षे संधीचा कालावधीही संपला, पण पुढची कारवाई का झाली नाही? माझी राज्य सरकारला विनंती आहे की स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयाकडे मागणी करावी."

कोपर्डी दुर्घटनेतील पिडित कुटूंबियांची भेट घेऊन संभाजीराजेंनी त्यांच्यासह बातचीत केली. या घटनेचे सामाजिक पडसाद राज्यभर पडले होते. त्यानंतर ऐतिहासिक अशा मराठा मूक मोर्चाचा जन्म झाला होता. सर्वप्रथम औरंगाबाद येथे 9 आगस्ट 2016 रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला त्यानंतर राज्यात मराठा मोर्चांची मालिकाच सुरू झाली.