गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलने केली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे विधान त्यांनी आज शनिशिंगणापूर येथे केले आहे. त्यामुळे मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोष करा असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आज शनिशिंगणापूर येथे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आज अहवाल सादर झाल्यानंतर 15 दिवसात यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी- वारकरी महासंमेलनावेळी सांगितले आहे. तर मराठा समाजाला आरक्षण तर मिळणारच आहे. त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी रुपयांची मदत मिळाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे. तर वारकरी आणि शेतकऱ्यांमुळे धर्म व संस्कृती जीवंत राहिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.