Supreme Court | (File Image)

गेल्या अनेक वर्षांपासून चिघळलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्तास नकार दिला असून पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. ही सुनावणी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या निर्णयाने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या पदरी काहीच पडले नाही अशी चर्चा रंगू लागली आहे. मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती कायम ठेवण्यात आली असून स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला देखील परवानगी नाही असेही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

मराठा आरक्षणावर स्थगिती हटविणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसिमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 5 वकिलांची एक समन्वय समिती जाहीर केली होती. या सर्वांनी आपापली बाजू योग्यरित्या मांडली. त्याचबरोबर राज्य सरकारकडून कपिल सिब्बल यांनी देखील आपली बाजू मांडली. मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती हटविण्यास तूर्तास नकार दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी घटनापीठासमोर आज दुपारी सुनावणी

ही सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. त्यावेळी यावर अंतिम निर्णय देण्यात येईल असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यावेळी घटनापीठ थेट मूळ प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा समाज मोर्चे, परिषदा, बैठका, आंदोलने आदींच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधू इच्छित आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातूनही मराठा समाजाला आरक्षण द्या परंतू, आमच्या कोठ्याला धक्का लावू नका अशी मागणी जोर धरत आहे.