पुणे: मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांचे निधन
Shantaram Kunjir | (Photo Credits: Facebook)

मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) समन्वयक, संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) कार्याध्यक्ष, शांताराम कुंजीर (Shantaram Kunjir) यांचे निधन झाले आहे. नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी (5 मे) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

शांताराम कुंजीर हे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आणि किसान क्रांती मोर्चाचे समन्वयकही होते. पुणे येथील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील मुंढवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

शांताराम कुंजीर यांनी अखिल भारतीय मराठा महासंघातून कार्यास प्रारंभ केला. त्यांनी मराठा सेवा संघ आणि बामसेफ अशा संस्थांसोबतही काम केले. पुढे त्यांनी संभाजी ब्रिगेडची जबाबदारी सांभाळली. (हेही वाचा, ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवाकार' उत्तम बंडू तुपे यांचे निधन; पुणे येथे वयाच्या 78 वर्षी घेतला अखेरचा श्वास)

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंजीर यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांताराम कुंजीर यांनी मराठा समाजाच्या दु:ख, वेदना आणि प्रश्नांसाठी कायमच संघर्षाची भूमीका घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करताना तरुणांनी वाचन करुन आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.