मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) प्रश्नी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपली आहे. सरकारला 30 दिवसांचा वेळ त्यांच्याकडून देण्यात आला होता. त्यावर अधिकचे 10 दिवसही दिले पण या मुदतीमध्ये सरकारने अद्याप मराठा आरक्षण जाहीर केलेले नाही त्यामुळे ही मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वीच सांगितल्यानुसार ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. नंतर 27 ऑक्टोबर पासून ते आमरण उपोषण करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करतील.
मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आजपासूनचे उपोषण हे विना पाणी आणि औषधाचे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्यांनाही गावाबंदी केली असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता सरकार बोलणी कशी करणार हे पहावं लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये बोलताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल असं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत त्यांनी ही घोषणा करत मराठा समाजाला विश्वास दिला आहे. दरम्यान यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जो पर्यंत हा आरक्षणाचा शब्द प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारने स्थापन केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती वेगाने काम करीत आहे. समितीला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. समितीचा अहवाल येण्यास किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सरकारने नियुक्त केलेल्या समितीने मागितली दोन महिन्यांची मुदतवाढ .
मनोज जरांगेंसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसात आरक्षण प्रश्नी 3-4 तरूणांनी जीव दिला आहे.