
शनिवार 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुंबईमध्ये (Mumbai) एक हृदयद्रावक घटना घडली होती. एका व्यक्तीने राहत्या इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून आपल्या मित्राच्या मुलीला चक्क फेकून दिले होते. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्यावर झालेली काळी जादू (Black Magic) काढण्यासाठी या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याची कबुली दिली आहे. अनिल चुगानी असे या आरोपीचे नाव असून, गेले सहा महिने तो दोन मुलांची हत्या करण्यासाठी मुंबईमध्ये राहता होता.
अनिल चुगानी मोरोक्को येथे काम करतो. तिथे तिच्यावर कोणीतरी जादूटोणा करून करणी केली. त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन जुळ्या बालिकांचा बळी देणे आवश्यक असल्याचे त्याला कोणीतरी सांगितले. त्यानुसार हे कृत्य करण्यासाठी तो मुंबईमध्ये आला. रेडिओ क्लब येथील ब्रह्मकुमारी मार्गावरील अशोका अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये सातव्या मजल्यावर तो राहू लागला. यादरम्यान त्याने जवळच राहणाऱ्या प्रेमलाल हातरामानी यांच्या कुटुंबाशी जवळीक साधली. प्रेमलाल हातरामानी यांना जुळ्या मुली आहेत. (हेही वाचा: कुलाबा: मित्राच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला 7 व्या मजल्यावरून फेकून दिले; मुलीचा मृत्यू, आरोपीला अटक)
याच जुळ्या मुलींचा बळी देण्याचे त्याने ठरवले. त्यानुसार त्याने प्रेमलाल यांच्या तीन मुलांना घरी बोलावून घेतले व त्यांना गुंगीचे औषध दिले. हीच संधी साधून त्याने त्यातील एका मुलीला 7 व्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर इतर मुलींनी आरडा ओरडा केल्याने लोक जमा झाले व अनिल याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिल चुगानी 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. त्याच्यावर सोमवारी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.