यंदा दुष्काळाची झळ संपुर्ण महाराष्ट्राला सोसावी लागत असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष करुन महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून तारेवरची कसरतच करावी लागतेय. मात्र ही तारेवरची कसरत यवतमाळ येथील महिलेच्या जीवावर बेतली असून पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
महागाव तालुक्यात असलेल्या माळेगाव येथे राहणाऱ्या विमल राठोड या विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीत पाणी अतिशय कमी होतं. त्यामुळे त्यांनी विहिरीत उतरुन पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पाणी काढण्याच्या प्रयत्नात विमल राठोड यांचा तोल गेला आणि 45 फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळल्या. खाली कोसळल्याने विमल राठोड यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि विमल यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
नांदेड येथे पाणीटंचाईचा बळी, संगिता गरड या महिलेचा बंदाऱ्यात बुडून मृत्यू
मृत महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका लक्षात घेता बीडीओ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.