Advay Hire Join Uddhav Thackeray Group: मालेगावचे भाजप नेते अद्वय हिरे यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश; शिवबंधन बांधताच साधला भाजपवर निशाणा
Advay Hire Join Uddhav Thackeray Group (PC - Twitter)

Advay Hire Join Uddhav Thackeray Group: शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका दिला आहे. मालेगावचे भाजप नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मालेगावचे शिंदे गटाचे नेते व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. अद्वय हिरे हे माजी महसूल मंत्री सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब हिरे यांचे पणतू असून माजी परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत.

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवबंधन बांधले. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केला, याला जास्त महत्त्व आहे. अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावलं पुढे चालेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (हेही वाचा -Sanjay Raut On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांची नाराजी, म्हणाले - त्यांनी युतीचा भागीदार म्हणून युती धर्म पाळावा)

अद्वय हिरे यांनी शिवबंधन बांधताच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2009 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मला भाजपात लोकसभेत निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपात काम करत आहे. भाजपाला साथ दिली तेव्हा सर्वजण पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा राजकारणात सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत अमृतभाई पटेल यांना पाडून आम्ही भाजप पक्ष भक्कम केला, असं अद्वय हिरे यावेळी म्हणाले.

अद्वय हिरे पुढे बोलताना म्हणाले की, व्यक्तिगत पदासाठी मी भाजपकडे कधीच मागणी केली नाही. माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी जनआंदोलनात मी रस्त्यावर उतरलो. पक्षाकडे न्याय मागितला पण पक्षाने शेतकऱ्याला मरू दिलं. जो पक्ष शेतकऱ्याला वाचवू शकत नाही, त्याच्या नेतृत्वात मी काम करणार नाही, म्हणून मी भाजपाचा त्याग केला, असं स्पष्ट मत हिरे यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याने कालपासून अनेकांचे फोन येत होते. अनेकांनी पक्षप्रवेश न करण्याचा सल्ला दिला. पण कितीही खोके दिले तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही. येत्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांना बसवल्याशिवाय हा कार्यकर्ता थांबणार नाही, असा निश्चय यावेळी अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.