Malad Building Collapse: मालाडच्या मालवणी येथील इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखाची मदत जाहीर; पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय
Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

गेले काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. काल या पावसात मुंबईमध्ये दोन दुर्घटना घडल्या. मालाडच्या (Malad) मालवणी परिसरात इमारतीच्या वरचा मजला बाजूच्या घरावर कोसळला व त्यानंतर संध्याकाळी फोर्ट भागात एका पाच माजली इमारतीचा काही भाग कोसळला. मालाड येथील दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

या दुर्घटनेमध्ये 13 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर काल उपचार झाले व आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील गेट क्रमांक पाच येथील दोन मजली इमारतीचा वरचा मजला काल बाजुच्या घरावर कोसळला होता. ही माहिती समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस घटन्स्थाली पोहोचले होते. त्यानंतर ताबडतोब बचाव कार्य हाती घेण्यात आले जे रात्री उशिरा पर्यंत चालले. या सर्व घटनेची पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

(हेही वाचा: Mumbai Building Collapse Update: फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, NDRF ची माहिती)

दरम्यान, मुंबईतील फोर्ट या ठिकाणी असलेल्या भानुशाली इमारतीबाबत झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग अचानक कोसळला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत असुरक्षित इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.