Makar Sankranti 2023: नागपूरात नायलॉनच्या मांज्याने घेतला 10 वर्षीय मुलाचा जीव; बाईक वरून जाताना गळा चिरल्याने मृत्यू
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

महाराष्ट्रामध्ये यंदा 15 जानेवारीला मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा करण्यात आला. संक्रांतीच्या निमित्ताने अनेकजण पतंगबाजीचा (Kite Flying) आनंद घेतात. पण राज्यात पतंगबाजीमध्ये नायलॉनचा मांजा (Nylone Manja) जीवघेणा ठरत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण या बंदीमध्येही अनेकांकडून सर्रास त्याचा वापर केला जात आहे. नागपूरात (Nagpur) एका चिमुकल्याच्या जीवावर हा नायलॉनचा मांजा बेतला आहे. 10 वर्षीय मुलगा बाईकवरुन जात असताना त्याचा गळा चिरला गेला आणि यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

नागपूरातील जरीपटका भागातील ही दुदैवी घटना आहे. इयत्ता 5वी मध्ये शिकणारा मुलगा दुचाकीवरून आपल्या बाबांसह निघाला होता.  घरी परतत  असताना ही घटना घडली आहे. वेद साहू असं या मुलाचं नाव होतं. शनिवारि संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवर वडीलांच्या समोर वेद बसला होता. अचानक त्यांच्या गळ्याजवळ मांजा गुंडाळला गेला. वेदचे वडील गाडी थांबवू शकतील त्याच्या आधीच वेदला या मांज्यामुळे गंभीर दुखापत झालेली होती. तो रक्तबंबाळ झाला. त्याच स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाच्या गळ्याला मांजा लागला. त्यामध्ये त्याच्या श्वसननलिकेला, त्या जवळ असणार्‍या रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये उपचारात रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. या मुलाच्या मृत्यूची नोंद अपघाती निधन करण्यात आली आहे. तर सदर घटनेप्रकरणी अधिक तपास देखील सुरू आहे. नक्की वाचा: Akola मध्ये नायलॉनच्या मांज्यामुळे आईसोबत दुचाकी वर जाणार्‍या साडेतीन वर्षीय मुलाचा चिरला गेला गळा.

महाराष्ट्रात राज्य सरकारने 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5  अन्वये मांजाची विक्री आणि  वापरावर बंदी  आणली आहे. बंदी असूनही चिनी व नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे यावरून दिसत आहे.