कोविड 19 चं संकट आता हळूहळू कमी होत असलं तरीही धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने संभाव्य कोरोना लाटेचा अंदाज घेत आता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या कोविड 19महामारीविरूद्ध लढण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने, टपाल कर्मचार्यांच्या हितासाठी चार रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल, एच. सी. अग्रवाल यांनी दिनांक 1 जून 2021 रोजी मुंबईतील सर्कल ऑफिस, येथून रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवून त्या रवाना केल्या.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या या रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलिंडरसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या सुविधांनी युक्त असून मेल मोटर सर्व्हिसेस, मुंबई यांनी मेल मोटर वाहनांचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर करून त्या तयार केल्या आहेत. या रुग्णवाहिका चालविण्यासाठी तात्पुरता परवाना देखील मिळविण्यात आला आहे. टपाल विभागाच्या कुटुंबातील सदस्यांच्या हितासाठी या रुग्णवाहिका कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे तैनात केल्या आहेत.
पोस्टमास्टर जनरल (मेल्स आणि बीडी), गणेश व्ही. सावळेश्वरकर, वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी) एस.बी. जॉन व्ही. ल्यूक आणि उपव्यवस्थापक (एमएमएस) श्री. एम. बी.डापसे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान महाराष्ट्रात आता शहरी भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. तर ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आता रूग्णसंख्या कमी असलेल्या आणि पुरेशी आरोग्य यंत्रणा सज्ज असलेल्या भागामध्ये येत्या काही दिवसांत लॉकडाऊनच्या नियमांमधून शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.