भोंदूबाबा कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले (Kapile Maharaj Black Magic) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्वत:ला भगवान दत्ताचा अवतार असल्याचे सांगत हा महाराज अनेकांची फसवणूक (Bhondubaba Practices Black Magic) करत असे. गुप्तधन, कुटुंबाची भरभराट अशा गोष्टींसाठी कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले हा रक्ताचा अभेषेक करत असे. अखेर प्राप्त तक्रारीवरुन माहुरी येथील या महाराजाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबास पोलिसांनी अटक केल्याचेही वृत्त आहे. नांदेड, डोंबिवली, पुणे यांसह विविध ठिकाणी या बाबाने अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे केवळ निरक्षरच नव्हे तर अनेक उच्चशिक्षितही या भोदू बाबाच्या कच्छपी लागलेले आणि पुढे यांना गंडा बसल्याचे पुढे आले आहे. या बाबा विरुद्ध बुधवारी (13 ऑक्टोबर) रात्री उशीरा माहूर पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भोंदूबाबा कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथील रहिवासी आहे. तो पाठिमागील काही वर्षांपासून सातत्याने माहुर येथील दत्त शिखर येथे येत असे. पुढे काही काळांनी त्याला दत्तशिखराच्या वतीने मातृतीर्थ परिसरात काही जागा देण्यात आली होती. बाबाने याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी एक टीनशेड उभारले होते. या शेडमध्ये त्याने अघोरी उपाय करण्यास सुरुवात केली.
भोंदूबाबा कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले याने नवरात्रोत्सवात दत्त शिखर येथे महाप्रसाद कार्यक्रमही सुरु केला होता. अनेक नामवंत मंडळी या बाबाच्या कार्यक्रमास हजेरी लावत होते. याशिवाय अनेक शिक्षित-उच्चशिक्षित लोक आणि सर्वसामान्य निरक्षर, परिस्थितीने गांजलेले लोकही या बाबाला भेट असे. गुप्तधन शोधून देणे, कुटुंबातील सदस्याला नोकरी लावणे, कौटुंबिक कलह दूर करणे, आजार बरे करणे अशा गोष्टींवर आपण उपचार करतो असा या बाबाचा दावा असे. त्याच्या दाव्याला भुलून अनेक लोक त्याच्या कच्छपी लागत. (हेही वाचा, Nagpur: संतापजनक! भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघींवर लैंगिक अत्याचार; भोंदूबाबा अटकेत)
सांगितले जाते की, आपण दत्त अवतार असल्याचे सांगत लोकांना भुलवणारा हा बाबा विविध अघोरी पूजा करत असे. त्यासाठी रक्ताभिषेक, कासव पूजा, मांडूळ पूजा असले विचित्र प्रकारही करत असे या पूजेच्या निमित्ताने त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. डोंबिवली येथील सुरक्षा अभियंता प्रवीण शेरकर ही व्यक्ती या बाबाचा भक्त होती. त्यांना या बाबाने वेगवेगळ्या मार्गाने 24 लाख रुपयांना गंडा घातला. पुण्यातही बाबाने अशाच प्रकारचा प्रताप केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांना भेटून मदत मागितली. त्यानंतर या बाबाचा भांडाफोड झाला.
पूजेच्या नावाखाली हा बाबा वाट्टेल त्या गोष्टी करत असे. जसे की यज्ञ करणे, यज्ञात भक्ताचे रक्त टाकून रक्ताभीषेक करणे. त्या यज्ञाची राख भक्ताला खायला देणे असे काही वाट्टेल ते प्रकार तो करत असे.