शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतु गेल्या 15 दिवसांत कोणतंही खाते वाटप न केल्याने कोणत्या पक्षाकडे आणि कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं जाणार याबद्दल सस्पेन्स वाढत होता. परंतु, ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या खातेवाटपाच्या यादीत प्रामुख्याने दिसलेली बाब म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक खात्यांची संख्या आलेली आहे. तसेच महत्त्वाची गृह आणि नगरविकास ही खातीसुद्धा शिवसेनेकडेच राहिली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 9 खाती आली आहेत.
मागील काही दिवसांपासून ग्रह खातं उद्धव ठाकरे यांच्याकडे येईल अशी चर्चा होती. परंतु तसं न होता, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना ग्रामविकास आणि जलसंपदा खाती मिळाली आहेत.
एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे 9 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण ,पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण अशी त्यांच्या खात्यांची यादी आहे.
छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना देखील काही महत्त्वाची खाती देण्यात आले आहेत. ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास, सामजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न वऔषध प्रशासन ही खाती त्यांच्या हात आली आहेत.
बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय या मंत्रिमंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.