सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत नोकरभरती करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी दिले आहेत. महापारेषण कंपनीत तांत्रिक विभागात तब्बल 8500 पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार असून लवकरच भरती प्रक्रीयेला सुरुवात होईल. 8500 पदांपैकी तांत्रिक विभागात 6750 तर अभियंता म्हणून 1762 पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात आलेले बेरोजगारीचे संकट दूर करण्याची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.
या भरती प्रक्रीयेत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. तसंच अभियांत्रिकी पदवीधारकांनासाठीही ही चांगली संधी आहे. महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव सादर केल्यानंतर पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. बक्षी समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करुन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. (Mumbai Power Outage: मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत)
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे 2005 साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाले. त्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेली. मात्र नोकरभरती करण्यात आली नाही. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला. त्यामुळे आता रिक्तपदं भरण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि नव्या तरुणांना कामाची संधी उपलब्ध होईल. (महावितरण कर्मचा-यांचा COVID-19 मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना मिळणार 30 लाखांचे सानुग्रह अनुदान- डॉ. नितीन राऊत)
तसंच महापारेषणमध्ये वेगवेगळ्या स्तरातील अनेक जागा रिक्त असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून कर्मचाऱ्यांना पदोन्नतीही मिळाली नव्हती. भरतीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रखडलेली पदोन्नतीही त्यांना देण्यात येईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.