
भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे पसरत चालले असून महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासह सर्व कोविड योद्धा (COVID Warriors) कसोशीने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थिती राज्यात अखंडित वीजपुरवठा करणा-या महावितरण (MSEB) कर्मचा-यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी घेतला आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून राज्याला सुरळीत वीजपुरवठा देणा-या महावितरण कर्मचा-यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना पाठवणार सरासरी बिल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा
अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजाविताना #कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.#नितीनराऊत यांनी घेतला आहे.@NitinRaut_INC
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 23, 2020
महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणाऱे सुरक्षा रक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.
राज्य सरकारने कोरोनाचा प्रर्दुभाव रोखण्यासाठी अनेकांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. अशा वेळी त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी महावितरणने 24 तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.