भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गणना केलेली आकडेवारी नुकतीच पंतप्रधानांनी जाहीर केली. यानूसार देशात 3 हजार 167 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येतही 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 446 वाघांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वाधिक वाघ हे चंद्रपुर जिल्ह्यात असून त्यांची संख्या 206 ते 248 इतकी आहे. त्यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 ब्रम्हपुरी वनविभागात 53 ते 66, मध्य चांदा वनविभागात 10, वरोरा-भद्रावती वनक्षेत्रात 13, राजुरा विभागात 2, प्रस्तावित कन्हाळगाव अभयारण्यात 13 ते 23, जुनोना वनक्षेत्रात 26 ते 43 वाघ आहेत.
वाघाच्या शिकारीसाठी मोठ्या संख्येने तृष्णभक्षक प्राणी ताडोबात आहे. त्यामुळे एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 वाघ आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील उष्ण वातावरणामुळे प्रजनन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष व वाघाच्या झुंजीत वाढ, वाघाच्या संख्येत झालेली वाढ, अपुरे अधिवास क्षेत्र यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष व दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे.