Rahul Narvekar On Sanjay Raut: संजय राऊत यांच्या 'विधिमंडळ चोरमंडळ' वक्तव्यावर 2 दिवसांत चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार-  विधानसभा अध्यक्षांची घोषणा
Sanjay Raut | (Photo Credit: Facebook)

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. पण हा दिवस संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'विधिमंडळ चोरमंडळ' या वक्तव्यावरून गदारोळामध्ये गेला आहे. आज सकाळी कोल्हापूर मध्ये मीडीयाशी बोलताना 'विधिमंडळ नाही ते चोरमंडळ आहे. सारे चोर आहेत.' असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभा, विधानपरिषदेमध्ये दिसले. शिवसेना, भाजपा (BJP) यांच्याकडून संजय राऊतांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सत्ताधार्‍यांकडून हक्कभंग (Breach of Privilege Motion) दाखल करण्याची देखील मागणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी पुढील दोन दिवस चौकशी करून 8 मार्चला निर्णय जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्य प्रकरणी विधानसभेत जसा गदारोळ झाला तसाच तो विधिमंडळ परिसरामध्येही झाला. शिवसेना आमदारांनी त्यांच्या विरोधात नारेबाजी केली. 'ज्यांच्या जीवावर संजय राऊत निवडून आले त्याच आमदारांना 'चोर' संबोधणं' चूकीचं असल्याचं मत शिवसेना आमदारांनी व्यक्त केले आहे. नक्की वाचा: Sanjay Raut यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याने विधानसभेत सत्ताधारी आक्रमक; त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी .

संजय राऊत यांचं स्पष्टीकरण 

संजय राऊतांनी आपल्या विधानाला समजून घ्या.  विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. काही जण  शिवसेना आणि धनुष्यबाण चोरून तेथे बसले आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्याला उद्देशून आपण हे वक्तव्य केलं असल्याचं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

दरम्यान विरोधकांनी मात्र संजय राऊतांच्या वक्तव्याला आमचा पाठिंबा नाही पण यावरून जनतेच्या प्रश्नासाठीचा वेळ वाया घालावला. दिवसभराचं कामकाज गुंडाळल्याने नाराजी देखील बोलून दाखवली आहे.