कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट; केल्या 'या' मागण्या
Maharashtra Women and Child Development Minister Yashomati Thakur (Photo Credits: ANI)

कोविड-19 (Covid-19) मुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासंदर्भात राज्यातील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Development Minister Yashomati Thakur) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली असून त्यांनी काही मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. कोविड-19 मुळे आई-वडील गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या बँक खात्यात 5 रुपये निश्चित ठेव जमा करावी. त्याचे व्याज मुलासाठी वापरता येईल. तसंच कोविड-19 मुळे एक पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 2500 रुपये देण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

दरम्यान, कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ठाकूर यांना दिले आहे. कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण आणि संगोपनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधिचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या  न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत देण्यात आले होते.

ANI Tweet:

(हे ही वाचा: कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळणार 5 लाख रुपयांची मदत)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले आहे. या काळात मृत्यूचे प्रमाण वाढले. दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. राज्य सरकारच्या आर्थिक मदतीमुळे अनाथ बालकांना नक्कीच मदत होईल.