नागपूर: महाविकास आघाडी सरकारचे सत्तेत आल्यापासूनचे पहिले अधिवेशन नागपूर (Nagpur) येथे सुरु आहे, 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणार्या या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज (21 डिसेंबर ) रोजी सहावा आणि शेवटचा दिवस आहे. वास्तविक सध्या राज्यात सुरु असणारा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा (Farmers Loan Waiver), नागरिकत्व दुरुस्ती विधयेकावरून (CAA) पेटलेल्या वादातील महाराष्ट्राची भूमिका आणि सुरक्षा हे चर्चेचे विषय ठरण्याची शक्यता होती पण वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अपमान आणि स्थानिक प्रश्न हे अधिवेशनात अधिक समोर आलेले मुद्दे ठरले. याशिवाय आज सिंचन घोटाळा (Irrigation Scam) प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळालेली क्लीन चिट हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. कालपासूनच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासहित भाजपने या मुद्द्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे आज प्रत्यक्ष विधानभवनात हा मुद्दा समोर येणार हे निश्चित आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन हे अनेकांसाठी पहिला अनुभव देणारे ठरले, विधानसभा निवडणुकीत एकूण 97 आमदार हे पहिल्यांदा निवडून आले आहेत, तर उद्धव ठाकरे हे देखील पहिल्यांदा हा प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव घेत आहेत त्यामुळे हे अधिवेशन हे विधानसभा आणि राजकीय कामाची ओळख करून घेण्यासाठी ठेवलेला वेळ म्हणून पाहता येईल. तर, या सत्रात मागील पाच दिवसात आमदारांचे फोटोसेशन, सावरकर मुद्द्यावरून भाजप काँग्रेस आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की हे लक्षवेधी मुद्दे ठरले. (Nagpur Winter Session 2019: अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्त आणि पूरग्रस्त शेतक-यासांठी केंद्र शासनाकडे केली 14,600 कोटी रुपयांची मागणी)
नवख्या ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस यांच्यासहित भाजप नेत्यांनी अनेक प्रयत्न केले होते. अशातच कधी तीन पायांचे सरकार म्हणत तर कधी सत्तेसाठी झुकणारे अशी टीका करत नवनिरवचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले होते. तर वेळोवेळी या टीकांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपवर घणाघाती शाब्दिक हल्ले चढवले होते.
दरम्यान, अधिवेशन जरी आज संपुष्टात येत असले तरी येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार, आरे कारशेड मुद्दा, शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळग्रस्त भागातील मदतकार्य हे मुद्दे महाराष्ट्र राजकीय वर्तुळात सातत्याने समोर येऊ शकतात, यावर विरोधी पक्षाची भूमिका आणि उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय कसे असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.