Maharashtra Winter 2021 Updates: यंदा जानेवारी महिन्यात सुरूवातीला मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस बरसला पुढे संक्रांतीलाही घामाच्या धारा वाहत असताना शेवट मात्र थंडीच्या गारव्यामध्ये होत आहे. आज मुंबईमध्ये यंदाच्या हिवाळा ऋतूमधील सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. मुंबई त आज पहिल्यांदा डिसेंबर 2020 नंतर 15 अंशापेक्षा कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सांताक्रुझ (Santacruz) परिसरात आजचं तापमान 14.8 सेल्सिअस इतके खालावल्याने थंडीत हुडहुडत आज मुंबईकरांची सकाळ झाली आहे.
मुंबई हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत वातावरणात फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही. परंतू हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
K S Hosalikar ट्वीट
Mumbai Santacruz recorded lowest min temperature of this season today morning from Dec 2020.
Good chill in air & a pleasant morning again, with first time in this season, the Scz Met Observatory recorded below 15°C.
No large change expected in next 24 hrs. Thereafter gradual rise pic.twitter.com/DZ4u9kmHCh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 29, 2021
मुंबईसोबतच महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्येही थंडीचा पारा घसरला आहे. ठाण्यात 18.2, जळगाव 14.6, कुलाबा 15.7, सातारा 14.7, नाशिक 10.8, बारामती 15.4, पुणे 12.7, माळेगाव 12.8, डहाणू 14.2 असे तापमान नोंदवण्यात आले आहेत. यंदा जानेवारीचा मध्य आला तरी सारे थंडीच्या प्रतिक्षेत होते. मध्यंतरी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही दिवस पाऊस बरसला होता. मात्र त्यापाठोपाठ आलेली ही थंडी अनेक पीकांना, फळांना लाभदायी ठरणार आहे.
उत्तर भारतामध्ये मात्र यंदा कडाक्याची थंडी आहे. अनेक ठिकाणी सकाळी दाट धुकं पहायला मिळते. कश्मीर, सिमला मध्ये बर्फ पडत असल्याने पर्यटक हा ऋतूचा आनंद लूटण्यासठी गर्दी करत आहेत.