Maharashtra Weather Update: मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी अवकाळी, काही ठिकाणी गारपीट, विविध जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानअंदाज
Mumbai weather (Photo Credit - Twitter)

Maharashtra Weather Forecast: देशाच्या एकूणच हवामानामध्ये मोठा बदल होत आहे. हिवाळा संपून ऋतूमान उन्हाळ्याकडे वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासोबतच काही ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट आणि कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकते असे म्हटले आहे. खास करुन मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Maharashtra Weather Update) आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये यलो अरर्ट जारी केला आहे.

ढगाळ वातावरण, हलका पाऊस

बंगालच्या उपसागरात मोठ्या होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. या बदलामुळे वाऱ्यातील आद्रतेचे प्रमाण अधिक झाल्याने कोकण, गोवा यांसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकते. खास करुन मुंबई, पुणे आणि ठाण्यातही ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचे दर्शन घडू शकते. धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वरुणराजा बरसू शकतो. (हेही वाचा, Weather Update Today: देशभरात 10 राज्यांमध्ये पाऊस, महाराष्ट्रातील हवामाना अंदाज काय? घ्या जाणून)

राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा

दरम्यान, राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इसारा आयएमडीने दिला आहे. राजधानी दिल्लीत तर वातावरणा अचानक बदल होऊन आज सकाळीच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला. दिल्लीकरांची आजची सकाळच मुळात हलक्या पावसाने झाली.

यलो अलर्ट जारी असलेले जिल्हे

जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी,धुळे, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

शेतकऱ्यांसाठी काळजीचा मुद्दा असा की, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस अनेक ठिकाणी हजेरी लावत असतानाच अनेक राज्यांमध्ये उन्हाच्या झळा वाडू लागल्या आहेत. परिणामी अचानक होणाऱ्या या बदलांचा शेतमालावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकीत तपमानाकडे वाटचाल सुरु झाली आहे. दुसऱ्या बाजूला गारीपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दिलासादायक बाब अशी की समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत वातावरण स्थिर होऊ लागले आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी सायकांळनंतर किंवा मध्यरात्री, पहाटेच्या वेळी पाऊस हजेरी लावतो आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी शनिवारी वादळी पावसासह गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या विभागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलीदेखील असल्याचे समजते.