(Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये मान्सून आगमनाच्या दिवसापासूनच जोरदार बरसत आहे. सुरूवातीचे काही दिवस मुसळधार बरसल्यानंतर आता पावसाने मागील काही दिवस मुंबई, ठाण्यात विश्रांती घेतली आहे. पण आज (17 जून) हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला कोकण, मुंबई सह ठाण्यात पुढील 3-4 तास हे मध्यम स्वरूपाच्या पावसाचे राहणार आहेत. त्यामुळे सकाळपासून अधून मधून बरसणारा पाऊस पुढील काही तास असाच राहणार आहे. Maharashtra Rain Update: कोकणात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई ठाण्यालाही सावधानीचा इशारा.

किनारपट्टीच्या परिसरासोबतच आज घाट परिसराला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, पुणे, नाशिकचा काही भाग, कोल्हापूर या भागामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

KS Hosalikar Tweet

दरम्यान मागील काही दिवसांत कोकणाला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. यामध्ये सिंधुदुर्गात काही गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. दरम्यान शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची देखील घटनासमोर आली आहे.

मुंबईतही अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मागील 24 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला असून कुलाबा मध्ये 97 मीमी तर सांताक्रुझ मध्ये 30 मीमी पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई, ठाण्यात आज सकाळपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे.