Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 2 डिसेंबर पर्यंत कोकण, मराठवाडा भागात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) आज (30 नोव्हेंबर) पासून पुढील तीन दिवस राज्यात कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाडा (Marathwada) मधील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळेस वीजांचा कडकडाट देखील होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी जवळ 1 डिसेंबर दिवशी पूर्व मद्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्याचा प्रभाव म्हणून काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. हा काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बरसण्याची शक्यता आहे.

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मधील भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. यावेळेस वीजांचा कडकडाट देखी होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यापूर्वी सतर्क राहणं गरजेचे आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटर असण्याची शक्यता असल्याने 1 आणि 2 डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर 2 आणि 3 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात 30 नोव्हेंबरला ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबद, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट असेल. 1 डिसेंबर दिवशीरत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट आहे तर 2 डिसेंबरला : रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट आहे.