Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्र तापणार, पुढचे दोन दिवस उष्णतेची अधिक लाट, राज्यात ऑरेंज अलर्ट जारी
Heatwaves | (Photo Credits: Pixabay- Archived, edited, symbolic images)

देशभरात यंदा उष्णता (Heatwave) काहीशी अधिकच वाढली आहे. अशात महाराष्ट्र तरी त्याला अपवाद कसा असणार. पुढचे दोन दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD) शनिवार आणि रविवार (30 एप्रिल आणि 1 मे) महाराष्ट्रात उष्णतेची ( Heatwave in Maharashtra) अधिक मोठी लाट असेल. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा अधिक प्रमाणावर तापलेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला येत्या 2 मे पासून मुंबई आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी आकाश ढगाळ राहू शकेल. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवली गेली आहे. एकूणच काय तर दोन दिवस महाराष्ट्र तापलेला (Maharashtra Weather Forecast) पाहायला मिळू शकतो.

हवामान विभागाने माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात चंद्रपुर जिल्ह्यात शुक्रवारी (29 एप्रिल) सर्वाधिक उष्णता पाहायला मिळाली. चंद्रपुरमध्ये या दिवशी कमाल तापमानाची नोंद 46.4 अंश सेल्सिअस इतकी झाली. तर हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सर्वसाधारण ते मध्यम श्रीणीतील उष्मा पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Weather Forecast: पाच राज्यांना यंदा उष्णतेच्या भयान झळा, देशातील अनेक ठिकाणी तापमान 45 डिग्रीवर पोहोचण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)

राज्यातील विविध शहरांतील तापमान

मुंबई

कमाल तापमान- 34 अंश सेल्सिअस

किमान तापमान- 27 अंश सेल्सिअस

पुणे

कमाल तापमान - 40 अंश सेल्सिअस

किमान तापमान- 25 अंश सेल्सिअस

नागपूर

कमाल तापमान- 45 अंश सेल्सिअस

किमान तापमान- 29अंश सेल्सिअस

नाशिक

कमाल तापमान- 40 अंश सेल्सिअस

किमान तापमान- 29 अंश सेल्सिअस

औरंगाबाद

कमाल तापमान- 41अंश सेल्सिअस

किमान तापमान- 25 अंश सेल्सिअस

देशभरातील उष्णतेबाबत माहिती देताना हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण भारताच्या तुलनेत प्रामुख्याने पाच राज्यांत यंदा उष्णता (Heat Wave) अधिक जाणवेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, यूपी आणि ओडिशा राज्यात उन्हाचा तडाखा यंदा नेहमीपेक्षा अधिक जाणवेल. तर भारताच्या इतरही अनेक ठिकाणी पारा 45 डिग्री सेल्सियसच्याही वर जाईलअसा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत काल आणि आजही नेहमीच्या तुलनेत दोन ते तीन डिग्री सेल्सियस अंशाची वृद्धी पाहायला मिळाली. इतर राज्यांमध्येही उष्णतेची वाढ कायम आहे.