र्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Photo Credit : Twitter)

कोकणातील पर्यटनाबाबत (konkan Tourism) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण मंजूर करण्यात आले आहे. यापुढेही कोकणच्या पर्यटन विकासासाठी शासनामार्फत व्यापक कार्य केले जाईल असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यटनमंत्री ठाकरे म्हणाले, कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे.

होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. यासंदर्भात वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊ, असेही ठाकरे यांनी सांगितले. उदय सामंत म्हणाले की, कोकणातील साने गुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी.

त्याचबरोबर कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धर्तीवर कोकणामध्ये ग्लोबल व्ह‍िलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. यासह औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भातही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणारे रस्त्यांचे जाळे मजबूत असावे. सर्व रस्ते दर्जेदार कसे होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. पर्यटकांसाठी शहरात सुरु करावयाच्या हॉप ऑन, हॉप ऑफ वाहतूक व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी, राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरुळ ही दोन्ही जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळे आहेत. औरंगाबाद-फर्दापूर-अजिंठा लेणी यासह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जेदार विकास होणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदी संबंधीत यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. (हेही वाचा: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ; 400 कोटींचे बजेट प्रस्तावित)

सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा मानस असून शिवरायांच्या कार्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी चालना देण्यात यावी. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा अधिक विकास होणे, त्याचबरोबर त्यांची प्रचार-प्रसिद्धी होऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसी आणि पर्यटन विभागामार्फत चालना देण्यात यावी, असे निर्देशही सत्तार यांनी यावेळी दिले.