सिगारेट ओढण्याच्या वादावरून भाडेकरूने घरमालकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे (Dhule) शहरातील मिल परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी भाडेकरूला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, आरोपीने मृत व्यक्तीच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याची पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रमेश हिलाल श्रीराव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. श्रीराव हे बॅंकेचे निवृत्त कर्मचारी असून धुळे शहराच्या मिल परिसरातील राजहंस कॉलनीत वास्तव्यास होते. दरम्यान, श्रीराव यांनी सहा महिन्यापूर्वी आपले घर विश्वनाथ मेमाने यांना भाडेतत्वावर दिले. मेमाने हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मेमाने यांचे दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. मोठा मुलगा अजिंक्य हा गेल्या काही महिन्यांपासून घरीच होता. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ मेमाने यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन होते. ते घरात असतानाही सिगारेट ओढायचे. यामुळे श्रीराव नेहमी मेमाने कुटुंबियाला सतत बोलायचे. एवढेच नव्हेतर, श्रीराव हे मेमाने कुटुंबाला नेहमी उलट सुलट बोलायचे. सतत बोलण्याचा राग मनात धरून अजिंक्यने श्रीराव यांचे घर गाठले. यावेळी श्रीराव हे त्यांच्या गच्चीवर नेहमीप्रमाणे योगासने करत होते. त्याचवेळी अजिंक्य याने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावडीने वार केला. ज्यामुळे श्रीराव यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Nagpur: कुटुंबातील पाच जणांची हत्या, कुटुंबप्रमुखाची आत्महत्या; नागपूर येथील धक्कादायक प्रकार
या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीने मृताच्या पत्नीचाही गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण झटापट करून प्रमिला श्रीराव या सुटल्याने त्यांचा जीव वाचला आहे. तसेच प्रमिला यांचा आवाज ऐकून शेजारील नागरिक मदतीसाठी धावले. यावेळी गच्चीवर रमेश श्रीराव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला.