Results | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) द्वारा घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (Supplementary Exam Results) येत्या बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 1 वाजता जाहीर होत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवड (Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर उत्सुक हा निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतात.

कोणकोणत्या विभागीय मंडळांचा निकाल?

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही सर्वच्या सर्व (9) मंडळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येतात. राज्य मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा 22सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. त्यासाठी राज्यातून इयत्ता दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी 355 केंद्रांवर, तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी 317 केंद्रांवर परीक्षा दिली. (हेही वाचा, Maharashtra Supplementary Exam Results: इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला होणार जाहीर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)

पुरवणी परीक्षा निकालाबाबत अधिक माहिती

निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी (21 ऑक्टोबर) कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र मिळवता येईल. विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयांबाबत विद्यार्थी माहिती घेता येईल. त्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://verification.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in हे संकेतस्थळ आहे. दरम्यान, यासाठी असलेल्या अटी/ शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जाणून घ्यायच्या आहेत.

Supplementary Exam Results | (Photo Credits: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)

दरम्यान, उत्तर पत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी गुरुवार (21 ऑक्टोबर 2021) ते शनिवार (30 ऑक्टोबर) या कालावधीत तर छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यासाठी शुल्क भरणाही ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.