कासारवडवली ते गायमुख मेट्रोला मंत्रीमंडळाकडून मान्यता
मेट्रो (Photo Credits: ANI)

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो4 प्रकल्पाचा विस्तार ठाण्यातील गायमुख पर्यंत करण्यात येणार आहे. तर गुरुवारी मंत्रीमंडळात या प्रकल्पासाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्य केलेल्या मेट्रोच्या आराखड्यातील मेट्रो मार्ग-4 या प्रकल्पास आधिच राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केलेला मेट्रो मार्ग-4 अ कासारवडवली- गायमुख या प्रकल्पाचा अहवाल एमएमआरडीने सादर केला आहे.

या प्रकल्पासाठी 449 कोटी रुपयांचा खर्च प्राधिकरणाच्या निधितून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम 2020 मध्ये पूर्ण होणार असल्याचे ही सांगितले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाने स्कतःचा निधी वापरणे, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) इत्यादी आंतरराष्ट्रीय किंवा आंतरदेशीय वित्तीय संस्थांमार्फत कर्जसहाय्य घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.