Maharashtra SSC Exam 2020: महाराष्ट्रात 12 वी नंतर आजपासून (3 मार्च) 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेस यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसणार आहेत. तर यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. अकरा वाजता सुरु होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या सर्व केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण 273 भरारी पथकांची तसंच विशेष महिला भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. (दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक, mahahsscboard.maharashtra.gov.in वर अधिक माहिती)
गेल्या वर्षी दहावीच्या निकालात घट झाल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जाणार आहेत. इयत्ता 10 वीच्या विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून दहावीच्या भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे तर अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. (SSC Board Exam 2020 साठी विद्यार्थ्यांसाठी 'या' महत्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर)
विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळावा म्हणून दोन पेपर्समध्ये पुरेसा खंड ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून 9 विभागीय मंडळातून म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण येथून परीक्षा घेतली जाणार आहे. तर परीक्षेचा ताण न घेता अभ्यास करुन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.