महाराष्ट्रासह देशभरात यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे शैक्षणिक वर्षांचं, परीक्षांचे आणि बोर्ड परीक्षांचेही वेळापत्रक बिघडलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात 12 वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाचा पेपर रद्द झाला आहे. तर राज्यातील CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे नवं वेळापत्रक संबंधित बोर्डाकडून जुलै माहिन्यासाठी जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचे, पुढील शिक्षणाचं प्लॅनिंग करणार्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये आता यंदाच्या निकालाचंही टेंशन आहे. मात्र आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार हळूहळू परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमध्येही रेड झोन भागात विद्यार्थ्यांना संचारबंदीच्या नियमांमधून मुभा देऊन परीक्षा केंद्र खुली केली जाणार आहेत.
महाराष्ट्रात लॉकडाऊन कडक असला तरीही पेपर तपासणीचं काम सुरू आहे. संबंधित कर्मचारी आणि शिक्षकांना पेपर तपासणीसाठी संचारबंदीच्या काळातही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे MSBSHSE सोबतच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांच्या निकालाच्या काही संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. तर पहा बोर्ड परीक्षांचे हे निकाल कधी आणि कोणत्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता?
MSBSHSE 10th, 12th बोर्ड परीक्षा निकाल
महाराष्ट्रात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा सुरळीत पार पडली आहे. तर 10 वी म्हणजे एसएससी परीक्षांमध्ये रद्द झालेल्या भूगोल विषयाच्या पेपरचे मार्क विद्यार्थ्यांच्या इतर विषयांच्या मार्कांच्या सरासरीने दिले जाणार आहे. सध्या लॉकडाऊन असला तरीही पेपर तपासणीच्या कामाला शिक्षकांना, मोडरेटर्सना पूर्ण परवानगी आहे. त्यामुळे यंदा वेळेत निकाल लागू शकतात. 9 मंडळात घेतल्या जाणार्या बोर्ड परीक्षांचे सारे पेपर तपासून पूर्ण झाल्यानंतर अंदाजे 10 जूनपर्यंत बोर्ड परीक्षाचे निकाल जाहीर होऊ शकतात. दरम्यान जून महिन्याच्या मध्यापर्यंत 12वीचा आणि त्यानंतर 10 वीचा निकाल आठवडाभरात जाहीर केला जाईल.
कुठे पाहण्यासाठी संकेतस्ठळ: mahahsscboard.in
CBSE बोर्ड परीक्षांचे निकाल
सीबीएससी बोर्ड परीक्षांचे कोरोनाच्या संकटात राखडलेले पेपर 1 ते 15 जुलै दरम्यान घेतले जाणार आहेत. दरम्यान पूर्वी झालेल्या परीक्षांच्या पेपर तपासणीचं काम सुरू आहे. आता 15 जुलै नंतर उर्वरित पेपर तपासून पुढील 15 दिवसात निकाल लावण्याचं आव्हान बोर्डासमोर असेल. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 10वी, 12वीचे निकाल हाती येऊ शकतात. CBSE 10th, 12th Board Exam 2020 Dates: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर cbse.nic.in वरून करा डाऊनलोड!
कुठे पाहण्यासाठी संकेतस्ठळ: cbse.nic.in, cbseresults.nic.in
ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे निकाल
ICSE/ ISC च्या 10, 12 च्या परीक्षा देखील कोरोना संकटामुळे रद्द झाल्या होत्या. मात्र आता नव्या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्यास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल हाती येऊ शकतात.
कुठे पाहण्यासाठी संकेतस्ठळ: cisce.org
महाराष्ट्रामध्ये 10 वी नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सार्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यामुळे यंदा 11 वीचे वर्ष सुरू करताना तिन्ही बोर्डाचे निकाल त्यापुढे प्रवेशप्रक्रिया आटपून नवं वर्ष सुरू करण्याचं आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. तसेच 12 वीच्या निकालावर पुढील उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणाचे पर्याय खुले होतात. त्यामुळे बोर्ड परीक्षांच्या सार्या विद्यार्थ्यांना यंदा निकालाचे वेध लागले आहेत.