दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट (Online Hall Ticket) मिळणार असून शाळांमध्ये ऑनलाईन हॉल तिकीटांचे वाटप केले जाईल. मंडळाच्या संकेत स्थळावरून 'स्कुल लॉगीन' (School Login) वरुन शाळांना ही प्रत डाऊनलोड करता येईल. SSC, HSC च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट मिळण्याचे हे पहिलेच वर्ष असून यापूर्वी सर्व विभागीय मंडळांना विभागामार्फत हॉल तिकीटे देण्यात येत होती. मात्र आता ही प्रक्रीया ऑनलाईन करण्यात आली आहे. (Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा)
विभागीय मंडळाच्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन हॉल तिकीटची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हॉल तिकीटाची प्रिंट काढल्यावर त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. (आता जिल्हा स्तरावरही चमकदार कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना SSC, HSC परीक्षेत मिळणार वाढीव गुण)
हॉलतिकीट दुरुस्ती
# हॉल तिकीटामध्ये विषय, माध्यम यांसारख्या चुका असल्यास दुरुस्तीसाठी ते विभागीय मंडळाकडे पाठवावे लागेल.
# फोटो, स्वाक्षरी, जन्मतारीख, विद्यार्थ्याचे नाव इत्यादी दुरुस्त्या असल्यास त्या शाळा किंवा महाविद्यालयीन स्तरावर करुन त्याची सुधारीत प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी लागेल.
# फोटो चुकीचा असल्यास त्यावर नवा फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारुन सही करुन विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्याच्या सूचना शाळा, महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
हॉल तिकीट हरवल्यास
विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट हरवल्यास शाळा, महाविद्यालयांकडून पुन्हा त्याची प्रिंट उपलब्ध होईल. मात्र त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' असे लिहून हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात येईल.